गडदर्शन

Speaker 1

समितीमार्फत आयोजित करण्यात येणारे पुरुष व महिला गडदर्शनाचे कार्यक्रम म्हणजे जिथे छत्रपति शिवरायांचा पदस्पर्श झाला, जिथे दैदिप्यमान इतिहास घडला अशा गड-दुर्गांना, घाटा-वाटांना, ऐतिहासिक स्थळांवर प्रत्यक्ष जाऊन तो इतिहास जगण्याची अनोखी पर्वणीच असते. त्यामुळे दरवर्षी सहभागी इतिहास प्रेमींचा आकडा वाढतच राहतो. गेल्या ३७ वर्षांत महाराष्ट्रातील बहुतेक गड-दुर्ग, ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन झालेल्या आहेत. म्हणून मागील ३ वर्षांत शिवजयंती उत्सव समितीने दक्षिण दिग्विजय-१, उत्तर दिग्विजय व दक्षिण दिग्विजय-२ या महाराष्ट्राबाहेरील मोहिमांचे आयोजन केले होते. सदर मोहीमांस शिवप्रेमीांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या मोहिमांत दक्षिणेतील जिंजी किल्ला, बृहदेश्वर मंदिर, श्रीशैलम येथील छत्रपति शिवाजी महाराजांचे स्फूर्तिमंदिर, उत्तरेतील आग्रा किल्ला,कुंजपुरा भूमी, बस्ताडा येथील छत्रपति शिवाजी महाराजांचा पुतळा, पानिपत समर भूमी, अटारी बॉर्डर या ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. या मोहिमाांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मोहिमांमध्ये त्या त्या ठिकाणच्या स्थानिक मराठी जनांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले. या स्थानिकांकडून समितीच्या मोहीम सदस्यांचे अतिशय आपुलकीने/ मानाने आगत-स्वागत करण्यात आले. या मोहीमांच्या निमित्ताने समितीने त्या त्या भागातही आपला कुटुंबविस्तार केलेला आहे. त्यांच्या प्रेमाची/स्नेहाची पावती म्हणून समितीतर्फेही त्या त्या ठिकाणी त्यांचा योग्य आदर सत्कार करण्यात आला. यामध्ये पानिपत येथील रोड मराठा श्री राम नारायण मराठा, तंजावरचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मा. श्री. आबाजीराजे भोसले, हैद्राबाद येथील तेलंगाणा मराठी मंडळाचे सरचिटणीस कै. श्री. लक्ष्मीकांत शिंदे तसेच अध्यक्ष मा. श्री. प्रकाश पाटील यांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल.